Sep 10, 2023
अपर्णा एंटरप्रायझेस लि. या भारतातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या बांधकाम साहित्य उत्पादक कंपनीने ‘अपर्णा आरएमसी’ या आपल्या ब्रॅंडच्या माध्यमातून, मुंबईतील रेडी-मिक्स कॉंक्रिटच्या (आरएमसी) वाढत्या बाजारपेठेत प्रवेश करीत असल्याची आज घोषणा केली. मुंबईतील एकूण बाजारपेठेत ५ टक्के हिस्सा मिळवण्याचे कंपनीचे ध्येय असून त्याकरीता शहरात सात आरएमसी प्लॅंट उभारण्याची कंपनीची योजना आहे. मालाड आणि ठाणे येथे कंपनीने यापूर्वीच दोन प्लॅंट उभारलेले आहेत. या व्यतिरिक्त, ‘अपर्णा आरएमसी’ची नागपूर आणि पुण्यासह महाराष्ट्रातील इतर शहरांमध्ये विस्तार करण्याचीही योजना आहे.
मुंबई शहरात पायाभूत सुविधांच्या गरजा सातत्याने वाढत असताना, त्यांमधील गरजांची पूर्तता करण्याच्या दृष्टीने, तसेच घरबांधणी क्षेत्रात मागणी व पुरवठ्यातील तफावत भरून काढण्याच्या दृष्टीने ‘अपर्णा आरएमसी’ने या शहरात विस्तार करण्याचे ठरविले आहे. मुंबई व उपनगरात विकासाचे व पुनर्विकासाचे अनेक प्रकल्प उदयास येत असताना शहरापासूनच्या २० किलोमीटरच्या त्रिज्येच्या परिघात आणखी काही प्लॅंट्स उभारण्याची अपर्णाची योजना आहे, जेणेकरून या भागांत लॉजिस्टिक्स व पोहोच यांचे नियोजन अधिक चांगल्या प्रकारे करता यावे. त्या अनुषंगाने, नजीकच्या काळात, दक्षिण मुंबई, कल्याण, पनवेल व मीरा रोड येथे प्रतिवर्षी सुमारे ५ लाख घनमीटर लक्ष्यित उत्पादन क्षमता असलेले सात आरएमसी प्लॅंट्स उभारण्याचे ‘अपर्णा आरएमसी’ने ठरविले आहे.
कंपनीच्या या वाढीच्या संधींबद्दल बोलताना अपर्णा एंटरप्रायझेस लि.चे व्यवस्थापकीय संचालक अश्विन रेड्डी म्हणाले, “आम्ही संपूर्ण भारतामध्ये विस्तार करण्याच्या आमच्या आक्रमक वाढीच्या योजनांचा एक भाग म्हणून मुंबईच्या बाजारपेठेत प्रवेश करण्यास उत्सुक आहोत. झपाट्याने विस्तारत असलेल्या पायाभूत सुविधा आणि गृहनिर्माण क्षेत्र यांमुळे मुंबई ही आमच्यासाठी एक चांगली बाजारपेठ ठरते. आर्थिक केंद्र असा या शहराचा लौकिक, परवडणाऱ्या घरांचे येथील प्रकल्प, पुनर्विकासाचे वाढते प्रमाण आणि येथे होणारी व्यवसायांची वाढ या सर्व बाबींचा विचार करता, येथे आमच्या विकासाचा आराखडा तयार करण्यासाठी एक मोठी संधी आहे. अपर्णा समुहाचा मजबूत वारसा आणि अपर्णा आरएमसीचा जवळपास दोन दशकांचा अनुभव यांच्या माध्यमातून मुंबईच्या बाजारपेठेचा फायदा आम्हाला घेता येईल, असा आम्हाला विश्वास वाटतो.”
सध्या ‘अपर्णा आरएमसी’ची संपूर्ण भारतात वार्षिक १५ लाख घनमीटर इतक्या काँक्रीट उत्पादनाची क्षमता आहे. आपली ही एकूण क्षमता २०२५ मध्ये ६० टक्क्यांनी वाढवून २४ लाख घनमीटर इतकी करण्याचे ‘अपर्णा’चे उद्दिष्ट आहे. महाराष्ट्रातील निवासी, व्यावसायिक आणि पायाभूत सुविधा विभागांतील संधी मिळविण्यासाठी धोरणात्मक व्यूहरचना व आक्रमक स्वरुपाच्या विस्तार योजना राबविण्याचे कंपनीने ठरविले असून त्यामध्ये ही क्षमतावाढ उपयोगी पडणार आहे.
मुंबईतील आरएमसी क्षेत्रात असलेल्या संधींबद्दल माहिती देताना अश्विन रेड्डी पुढे म्हणाले, “मुंबईतील आरएमसी बाजारपेठेची क्षमता वर्षाकाठी १२० लाख घनमीटर आहे आणि आम्ही आमच्या कार्यक्षम कारभाराच्या अनुभवातून यातील ५ लाख घनमीटर पुरवठ्याची जबाबदारी पेलण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. महत्त्वाचे म्हणजे, आम्ही आमच्या ग्राहकांना ‘एम-१०० ग्रेड’चे कॉंक्रिट देण्यासाठी सज्ज आहोत.”
अपर्णा आरएमसी तिच्या सर्व २७ प्लॅंट्समध्ये श्विंग स्टेटर काँक्रीट बॅचिंग उपकरणे वापरते. ती ६० घनमीटरच्या मोठ्या इनलाइन क्षमतेने सुसज्ज आहेत. कंपनीच्या उत्पादनामध्ये सातत्य येण्यासाठी ही क्षमता उपयोगी पडते.
कंपनीच्या या विभागाकडे ३०० ट्रान्झिट मिक्सर, ७० काँक्रीट पंपिंग सिस्टीम आणि पाच बूम पंप आहेत. उंच इमारतींसाठी काँक्रीटचे पंपिंग करण्यास ही उपकरणे सक्षम आहेत.